कॅमस्कॅनरच्या टक्करला आले मेड इन इंडिया ‘फोटोस्टॅट’ अ‍ॅप

भारताने अनेक चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर भारतीय अ‍ॅप्सची चांदी झाली आहे. चीनी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यावधीच्या घरात होती. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेक युजर्स त्यांचा पर्याय शोधत होते. यातीलच एक लोकप्रिय अ‍ॅप कॅम स्कॅनर हे होते. या अ‍ॅपच्या मदतीने कोणतीही फाईल स्कॅन करून पीडीएफ फाईल्स तयार करता येत होती. आता याच अ‍ॅपला तोडीसतोड म्हणून मेड इन इंडिया फोटोस्टॅट हे अ‍ॅप आले आहे.

कॅम स्कॅनरमध्ये नसलेले अनेक फीचर्स तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळतील. डॉक्यूमेंट स्कॅन करण्यासाठी हे सर्वोत्तम मेड इन इंडिया अ‍ॅप मानले जात आहे. या अ‍ॅपचे कोणतेही वॉटरमार्क देखील डॉक्यूमेंट्सवर दिसत नाही व हे 100 टक्के मोफत आहे. यात कोणतीही जाहिरात देखील यूजरला दिसत नाही. या अ‍ॅपच्या फीचर्सबद्दल सांगायचा तर यात हिंदी भाषेचा सपोर्ट मिळतो.

युजर्स यातील महत्त्वाच्या डॉक्यूमेंट्सला फेव्हरेट म्हणून मार्क करू शकतात. सोबतच वन क्लिक शेअरचा देखील पर्याय मिळेल. युजर या अ‍ॅपला प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. डॉक्यूमेंटला पीडीएफ फॉर्मेटमध्ये देखील सेव्ह किंवा शेअर करता येईल.

या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे यात ओसीआरचे (टेक्स्ट रेकग्निशेन) फीचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने डॉक्यूमेंटवरील शब्द सहज कॉपी होतील. यात डार्क मोडचा देखील पर्याय मिळेल. प्ले स्टोर्सवर या अ‍ॅपला आतापर्यंत 4.8 रेटिंग मिळाली आहे.