प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन


इदौर – प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले असून त्यांना रविवारी मध्य प्रदेशातील इंदौरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यातच त्यांना आज दोनदा हृदयविकाराचे झटके आल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉ. विनोद भंडारी यांनी दिली.

राहत इंदौरी यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ट्विट करत सांगितले होते, माझ्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अरविंदो रुग्णालयात मला दाखल करण्यात आले आहे. मी लवकरात लवकर या आजाराचा पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल, असे म्हटले होते. त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर काही महिन्यांपूर्वी खूप चर्चेत आला होता. या शेरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळच घातला होता.