बैरूतमधील स्फोटांपासून धडा घेत चेन्नईमधील ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा साठा लावला मार्गी


चेन्नई – लेबनॉनचे बैरुत शहर मागच्या आठवड्यात अमोनियम नायट्रेटच्या महाभयंकर स्फोटांनी हादरले होते. शेकडो निष्पाप नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले. हा अमोनियम नायट्रेटचा साठा बैरुतमधील एका गोदामात करुन ठेवण्यात आला होता. बैरुतमधील या घटनेनंतर आपल्या देशातील चेन्नई शहरातही एका गोदामामध्ये अशाच प्रकारे काहीसे टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे समोर आले होते.

बैरुतच्या दुर्घटनेपासून योग्य तो धडा घेत, चेन्नईतील अमोनियम नायट्रेटचा साठा मार्गी लावण्यात आला आहे. चेन्नईतील स्फोटक केमिकलचा ई-लिलाव झाला असून आता हैदराबादला हा साठा पाठवण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अमोनियम नायट्रेटचा हा साठा चेन्नईत जिथे होता, त्याच्या आसपास जवळपास १२ हजारची लोकवस्ती आहे.

६९७ टन केमिकल चेन्नईजवळ एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते. केमिकलने भरलेले काही कंटेनर आधीच हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन उर्वरित केमिकलही कार्गोने पाठवण्यात येईल, असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. हा केमिकल पदार्थ कस्टम कायदा १९६२ अंतर्गत २०१५ साली जप्त करण्यात आला होता. चेन्नईपासून २० किमी अंतरावर असलेल्या फ्राईट स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटन भरलेले कार्गो ठेवण्यात आले होते. हे केमिकल तामिळनाडूतील एका आयातदाराकडून जप्त करण्यात आले होते. रासायनिक खत पदार्थ असल्याचे त्याने सांगितले होते. पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात स्फोटक केमिकल होते, असे सांगितले.