पापड खा आणि कोरोनाला पळवा, असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री कोरोनाबाधित


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी पापड खा आणि कोरोनाला पळवा असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मेघवाल यांच्याकडे अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज या दोन विभागांचं राज्यमंत्री पद आहे. मेघवाल यांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अर्जुन मेघवाल चांगलेच व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भाभीजी पापड या ब्रँडचं उद्घाटन करत असताना मेघवाल यांनी…भाभीजी पापड खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूशी लढण्यास मदत होते असे अजब वक्तव्य केले होते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती या पापडांमुळे वाढण्यासही मदत होईल असे मेघवाल म्हणाले होते. या विधानानंतर मेघवाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अर्जुन मेघवाल यांच्याबरोबरच आणखी एक केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. राजस्थान येथील जोधपूर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.