आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय; रोखली १०१ संरक्षण उत्पादनांची आयात


नवी दिल्ली – संरक्षण खात्याला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०१ उत्पादनांची यादी तयार करण्यात आली असून राजनाथ सिंह यांनी या उत्पादनांच्या आयातीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी मिळेल, असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले होते, त्यानंतर राजनाथ सिंह हे महत्त्वाची घोषणा करणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

संरक्षणासाठी लागणारी उत्पादने ही मेड इन इंडिया असावीत असा या मागचा मुख्य उद्देश आहे. ही यादी खासगी आणि पब्लिक सेक्टरशी चर्चा करुन तयार करण्यात आली आहे. भारताच्या तिन्ही दलांनी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत आत्तापर्यंत २६० योजनांसाठी साडेतीन लाख कोटींची कंत्राटे दिली होती. पण हीच कंत्राटे आता देशात मिळाली तर पुढील सहा ते सात वर्षात भारतातील उत्पादकांना ४ लाख कोटींची कंत्राटे दिली जातील, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

भारताचे २० जवान गलवानमध्ये झालेल्या संघर्षात शहीद झाल्यामुळे चीन आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. अशात आता राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. उत्पादनांच्या आयातीवर सगळ्या स्टेक होल्डर्सशी चर्चा केल्यानंतर बंदी घालण्यात येईल. हे निर्णय २०२० ते २०२४ या कालावधीत लागू करण्यात येतील. १०१ उत्पादनांच्या यादीत AFVs चा समावेश आहे. यासाठी ५२ हजार कोटींचे बजेट तयार करण्यात आले आहे.