ईडीच्या चौकशीत मोठा गौप्यस्फोट; एकट्या रियानेच नाही तर सीएने देखील मारला सुशांतच्या पैशांवर डल्ला


मुंबई – सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) रियाने धक्कादायक खुलासे केले आहेत. रिया चक्रवर्तीची ईडीने सुशांतच्या खात्यातून करोडो रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली आठ तास चौकशी केली. रियाने यामध्ये सुशांतच्या सीएचेही नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. सुशांतच्या नव्हेतर रियाने त्याच्या मोठ्या बहिणीच्या एफडीवरही डल्ला मारला आहे.

सुशांतच्या मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून वडिलांनी अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. पण, ईडी आणि सीबीआयने या प्रकरणात लक्ष घातल्यावर साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. ही चौकशी थांबविण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर मुंबई पोलिसांनीही सीबीआय चौकशीला विरोध केला आहे.

ईडीने या साऱ्या पार्श्वभूमीवर रिया आणि तिच्या भावाला चौकशीला बोलावले होते. रियाची 8 तास आणि तिच्या भावाची दुसऱ्या दिवशी 18 तास चौकशी करण्यात आली. रियाने यामध्ये ईडीला सीएचे नाव घेत त्यांचाही यात सहभाग असल्याचे सांगितले आहे. सुशांतने आपल्या मोठ्या बहीणीच्या नावे साडे चार कोटी रुपयांची एफडी ठेवली होती. पण, सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर दोन्ही सीए आणि तिच्या भावाने मिळून त्यातील अडीज कोटी रुपये गायब केल्यामुळे सुशांतच्या बहिणीच्या एफडीमध्ये केवळ दोन कोटी रुपयेच राहिले आहेत, असे सुत्रांनी सांगितले. ईडीला रियाने सांगितले की, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा लेखाजोखा पाहणाऱ्या दोन चार्टड अकाऊंटटना दोन कोटी 65 लाख रुपये देण्यात आले.

याशिवाय सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार ईडीला आढळले आहेत. रियाला यावर विचारले असता तिने उत्तर देणे टाळल्यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सारेकाही समोर येणार आहे.