भाजपला परशुरामाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची समाजवादी पक्षाची तयारी; उभारणार १०८ फूटी पुतळा


लखनौ – सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी राम जन्मभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपने अनेक वर्षांपासून राजकीय अजेंड्यावर असलेला राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आता राजकीय आघाडी घेतली आहे. आता भाजपच्या त्याच राजकीय अजेंड्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इतर राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाने ब्राह्मण समाजाच्या व्होट बँकेचा विचार करून भाजपच्या राम मंदिराला परशुरामाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

आपल्या पक्षाकडे ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्यात समाजवादी पक्षानेच उत्तर प्रदेशात ब्राह्मणांसाठी सर्वात जास्त काम केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचा सन्मान वाढवण्यासाठी भगवान परशुरामाचा भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. १०८ फूट या मूर्तीची उंची असेल तसेच तिची स्थापना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये उभारण्यात येईल.

समाजवादी पक्षाकडून मूर्ती उभारण्याच्या तयारीस सुरुवात झाली आहे. तसेच सपाचे नेते त्यासाठी जयपूर येथे पोहोचले असून ही मूर्ती परशुरामा चेतना ट्रस्टच्याअंतर्गत स्थापन केली जाईल. देशातील नामांकित मूर्तीकार अर्जुन प्रजापती आणि अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा निर्माण करणाऱ्या राजकुमार मूर्ती उभारण्यासाठी यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रतिमा स्थापित करण्यासाठी समाजवादी पक्षाच्यावतीने देणग्यांच्या माध्यमातून निधी गोळा केला जाणार आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण व्होटबँकेच्या राजकारणाने जोर पकडला आहे. ब्राह्मण विकास दुबेचे एन्काऊंटर आणि नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक आहे. तसेच ब्राह्मणांशी राज्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ जोडला जात आहे. तसेच समाजवादी पक्षानेदेखील आपल्या दिग्गज ब्राह्मण नेत्यांकडे या राजकारणाची धुरा सोपवली आहे.