… म्हणून टेस्ट क्रिकेट जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, युवराजने व्यक्त केली खंत

माजी क्रिकेटपटू युवराज सिंग भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. मर्यादित ओव्हरच्या सामन्यात युवराज आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. मात्र त्याला टेस्ट क्रिकेट जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. युवराजला या गोष्टीचे वाईट देखील वाटते.

टाईम्स नाऊशी बोलताना युवराज सिंह म्हणाले की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवावरून खूप काही शिकलो. या गोष्टीची खंत आहे की आपल्या करिअरमध्ये टेस्ट क्रिकेट जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा असे वाटते की मला अधिक टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळायला हवी होती. त्यावेळी सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौर गांगुली सारखे खेळाडू असताना संधी मिळणे अवघड होते.

युवराजनुसार आजच्या खेळाडूंना 10 पेक्षा अधिक टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळते. तर त्याला केवळ 1-2 वेळा संधी मिळाली होती. युवराज म्हणाला की, मधल्या फळीत जागा मिळवणे अवघड होते. आम्हाला खूप कमी संधी मिळत असे. मला वाटते, सौरव गांगुली निवृत्त झाल्यानंतर मला संधी मिळाली. पंरतू, त्यानंतर मला कॅन्सर झाला आणि आयुष्याने एक नवीन वळण घेतले.