नवनीत राणा यांच्या पाठोपाठ आता रवी राणा यांना देखील कोरोनाची लागण


अमरावती – काल खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांना देखील आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता राणा परिवारातील तब्बल बारा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राणा दाम्पत्याच्या दोन मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर रवी राणा यांच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या नागपूर येथील रुग्णालयात राणा कुटुंबियांवर उपचार सुरु आहेत. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रवी राणा हे आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूरला घेऊन गेले होते. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्यामुळे नवनीत यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ नवनीत राणा यांनी शेअर केला होता. यावेळी त्यांनी, हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वॅब घेताना, ज्या पद्धतीने तो रडायला लागला, हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

अमरावतीमधील आरोग्य यंत्रणा पार ढासळली असून कोरोनाबाधित रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाची तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.