९ कोटी ९९ लाखात OLX वर विकायला काढले चक्क Mig-२३ फायटर जेट


२००९ साली मिकोयान गुरेवीच मिग २३ बीएन हे फायटर जेट अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला (एएमयू) भारतीय हवाई दलाने भेट म्हणून दिले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे कॅम्पसमध्ये स्मारकाच्या स्वरुपात उभ्या असणाऱ्या या मीग २३ विमानाचे फोटो ३ ऑगस्ट रोजी ओएलएक्स या जुने सामाने विकणाऱ्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे म्हणत अपलोड करण्यात आले होते. ९ कोटी ९९ लाख रुपयांना हे विमान विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहीरात या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. आता विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ओएलएक्सवर कॅम्पसमधील भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो टाकण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर ओएलएक्सशी विद्यापीठाने संपर्क करुन ही जाहिरात हटवण्याची विनंती केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ओएलएक्सने तातडीने ही जाहिरात साईटवरुन काढून टाकली. कोणीतरी ही जाहिरात विद्यापीठाचे नाव खराब करण्यासाठी मुद्दाम पोस्ट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान विद्यापीठाचे प्रॉक्टर असणाऱ्या मोहम्मद वसिम अली यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओएलएक्सवर या विमानाच्या विक्रीसंदर्भात पोस्ट करण्यात आलेली माहिती चुकीची आहे. हे विमान विकण्याची किंवा त्याचा लिलाव करणाऱ्याचा विद्यापीठाचा कोणताही विचार नाहीय. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. हे विद्यापीठाचे नाव खराब करण्यासाठी केल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणाची चौकशी आम्ही करत असून हे फोटो ओएलएक्सवरील जाहिरात काढून टाकण्यात आला आहे. कोणीतरी विद्यापीठाची बदनामी करण्यासाठी जाणूनबूजून हे करत असल्याचे अली यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले आहे. एएमयूमधील इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मिग २३ विमानांमधील वेगवेगळे भाग, तंत्रज्ञान, डिझाइन या गोष्टींचा समावेश आहे. एरोनॉटिकल इंजिनियरिंग ही मेकॅनिकल इंजिनियरिंगची शाखा असून विद्यार्थ्यी यासंदर्भातील शिक्षण कॉलेजमध्ये घेतात, असे झाकीर हुसैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे मुख्याध्यापक असणाऱ्या प्राध्यापक एम. एम. सुफयान बेग यांनी सांगितले आहे.

एमएमयूचा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच स्मारक म्हणून फायटर विमानाचे इन्सटॉलेशन करणाऱ्या देशातील पहिल्या सात विद्यापीठांमध्ये समावेश होतो. तर कॅम्पसमध्येच विमानाचे अशाप्रकारे इन्स्टॉलेशन करणारे एमएमयू हे उत्तर प्रदेशमधील पहिलेच विद्यापीठ आहे.

रशियन बनावटीचे मिग-२३ हे विमान आहे. १९७० च्या काळामध्ये हे विमान बनवण्यात आले आहे. २४ जानेवारी १९८१ रोजी भारतीय हवाई दलामध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला होता. पण त्यानंतर अत्याधुनिक विमानांमुळे २८ वर्षांनी म्हणजेच ६ मार्च २००९ रोजी ही विमाने हवाई दलामधून निवृत्त करण्यात आली.