ऑक्सफर्डपाठोपाठ सीरमसोबत नोव्हाव्हॅक्सने केला लस पुरवठयाचा करार


नवी दिल्ली – नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात करार केल्याची ही माहिती बुधवारी नोव्हाव्हॅक्सने दिली. नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे.

नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार या करारामुळे सीरमकडे असणार आहेत. नोव्हाव्हॅक्सच्या एसईसी फाईलनुसार, हा करार ३० जुलै रोजी झाला. प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या लसीचे मिळाले आहेत. नोव्हाव्हॅक्स तिसऱ्या फेजची चाचणी सप्टेंबरपासून सुरु करेल, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अमेरिकेने ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत कोरोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती. एखाद्या कंपनीला लस निर्मितीसाठी देण्यात येणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी आहे. अमेरिकेने अन्य कंपन्यांना सुद्धा कोरोनावरील लस निर्मितीसाठी निधी दिला आहे.

सीरमकडे नोव्हाव्हॅक्सप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन आणि पुरवठयाचे अधिकार आहेत. सीरमकडून भारतात लवकरच ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होतील.