मुस्लिम नेत्याने ओकली गरळ; मशीद बांधण्यासाठी पाडले जाईल राम मंदिर !


नवी दिल्ली – काल अयोध्येतील राम मंदिराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अंदाजे तीन वर्षांत अयोध्येतील राम मंदिर हे बांधून पूर्ण होईल, असे मंदिराचे संरचनाकार सांगत आहेत. पण याचदरम्यान, एक चिथावणीखोर वक्तव्य ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी केले आहे.

ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मशीद ही कायम मशीदच असते, असे इस्लाम सांगते. मशीद पाडून त्या जागी दुसरे काहीही बांधता येत नाही. आम्हाला खात्री आहे की तिथे मशीद होती आणि कायम राहिल. मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्यात आली नव्हती. पण आता कदाचित मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते, अशी दर्पोक्ती केली. तसेच, राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचा अपमान केल्याचेही मत मौलानांनी मांडले.

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिर भूमिपूजनानंतर यावर नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या पदाचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली होती. जिथे एकेकाळी मशीद उभी होती, तिथे मंदिराचे भूमिपूजन करणे हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे, ओवेसी यांनी म्हटले होते.