ठाकरे सरकारने गुंडाळली फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना


मुंबई – फडणवीस सरकारने घेतलेला शेतकऱ्यांच्या संदर्भातील एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला आहे. ठाकरे सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली बळीराजा चेतना योजना बंद केली आहे. २०१५ मध्ये ही योजना जाहीर झाली होती. ही योजना विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे ही योजना बंद करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा महाविकास आघाडी सरकारने आढावा घेतला. या योजनेमुळे उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये कोणतीही घट न झाल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३२ हजार ६०५ शेतकऱ्यांनी २००१ ते २०१९ या कालावधीत आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार होते त्या कालावधीत २०१५ ते २०१८ या कालावधीत १४ हजार ९८९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.