रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल नाही


नवी दिल्ली – रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आजा नव्या पतधोरणाबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर कोणताही बदल रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात करण्यात आला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

देशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होता आहे. २०२० च्या पहिल्या सहामाहीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली आहे. आयातीवरही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर याचा मोठा फटका जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही बसला आहे. येत्या काळात कोरोनाची लस आल्यास हे चित्र बदलण्याची शक्यता असल्याचे मत देखील शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.

तसेच खरीपाच्या पेरणीतही चांगल्या पावसामुळे वाढ झाली आहे. देशाचा आर्थिक विकासदर येत्या काळात उणेमध्ये राहण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली. त्याचबरोबर रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा निर्णय एमपीसीने सर्वानुमते घेतल्याचेही दास म्हणाले. सध्या देशात महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसऱ्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे. पण आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ होत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती जानेवारी ते जून या कालावधीत बिकट असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर आगामी काळात खाद्यपदार्थांचे दर वाढण्याचीही शक्यता देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आली. यावर्षी जून महिन्यात वार्षिक महागाई दर मार्चच्या तुलनेत वाढून ५.८४ टक्क्यांवरून ६.०९ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मीडिअम टर्म टार्गेटपेक्षा तो अधिक आहे. २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान रिझर्व्ह बँकेचे हे टार्गेट असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.