गुजरातमधील कोविड रुग्णालयात अग्नितांडव, आठ जणांचा होरपळून मृत्यू


अहमदाबाद: गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबादमधील एका कोविड-19 रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तीन महिलांचा या आठ रुग्णांमध्ये समावेश आहे. अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. ही आग स्फोट झाल्याने घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास 40 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने आपण दु:खी झालो असून मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना यथासंभव मदत केली जात आहे.

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, गुरुवारी पहाटे अहमदाबादमधील नवरंगपुरा परिसरातील श्रेय हॉस्पिटलमध्ये आग लागली. दवाखान्यातील कोरोना पॉझिटिव्ह 40 अन्य रुग्णांना वाचवण्यात यश आले असून अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. हॉस्पिटलला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात आग लागली होती. तेथे मृत्यूमुखी पडलेले रूग्ण हे कोरोनाबाधित होते. दरम्यान 40 रूग्णांना इतरत्र सुरक्षित हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.