सॅटलाईट फोटोंनी दाखवली बैरुत स्फोटाची दाहकता


बैरुत – अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये प्रचंड स्फोट झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या स्फोटांची दाहकता फोटोतूनही दिसून येत आहे. किमान १३५ लोक या स्फोटात ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तेथील सरकारने या स्फोटांनंतर दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. लेबनॉन सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडल्यानंतर आणीबाणीची घोषणा करण्यात आली. तसेच बैरुत बंदराच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास होईपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

बैरुतच्या रहिवाशांना मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटानंतर बुधवारी सकाळी या भीषण विध्वंसाची दृश्ये नजरेला पडली. नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता.

दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर विखुरली होती, तसेच इमारतींचे दर्शनी भाग भग्न झाले होते. बेपत्ता किंवा जखमी झालेल्या आपल्या प्रियजनांबाबत कळावे म्हणून लोक रात्रभर शहरभरातील रुग्णालयांमध्ये ताटकळत होते.

दरम्यान, स्फोटानंतरच्या काही सॅटलाईट इमेजेसही समोर आल्या आहेत. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती होती याचाही अंदाज येतो.