गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांनो जाणून घ्या आरक्षणाचे नियम आणि तिकीट दर


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास मुंबई, पुणे, ठाण्यातील चाकरमान्यांना परवानगी मिळणार की नाही याबाबत मागील अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. पण, अखेर चाकरमान्यांना गणपती पावला आणि राज्य सरकारने काल मोठा निर्णय घेत चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी परवानगी दिली. पण त्याकरिता चाकरमान्यांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

अनिल परब यासंदर्भात बोलताना म्हणाले, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता १४ दिवसांच्या ऐवजी १० दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येईल. चाकरमान्यांसाठी एसटीच्या ३ हजार विशेष बसगाड्या सोडण्यात येतील. या गाड्या ५ ते १२ ऑगस्ट पर्यंत धावतील. एका बसमध्ये २२ प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रवासासाठी ई-पास आवश्यक नसेल. मात्र, सर्वाना मास्क अनिवार्य असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, परब यांच्या घोषणेनंतर एसटी महामंडळाने गाड्यांचे नियोजन कसे असेल, याचा तपशील जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर कोकणातील प्रमुख बसस्थानकात म्हणजे चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी अशा ठिकाणी मुंबईतून गाड्या चालवल्या जातील. येथून गावखेड्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून बस चालवण्यात येतील.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अशी असेल एसटीची सुविधा व नियम

  • मुंबईतुन कोकणात जाण्यासाठी ५ ते १२ ऑगस्टपर्यंत एसटी सेवा
  • कोकणातून मुंबईत परत येण्यासाठी २३ ऑगस्टपासून पुढे एसटी सेवा
  • तिकीटदर नेहमी प्रमाणे असेल.
  • विलगीकरणाचा कालावधी १० दिवसांचा असेल.
  • प्रवासा दरम्यान ई पासची आवश्यकता नाही.
  • एका बसमध्ये २२ प्रवाशी बसू शकतील.
  • प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक असेल.
  • महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तसेच महामंडळाने नेमलेल्या खासगी एजंटमार्फत ( रेडबस आणि इतर ) तिकीट आरक्षित करता येईल. ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
  • सांघिक आरक्षणासाठी एकाच गावात राहणाऱ्या २२ प्रवाशांनी एकत्र येत त्यांची यादी जवळच्या एसटी स्थानकावर/आगारात जमा करावी.
  • यावर्षी रेल्वे सेवा बंद असल्याने गाड्यांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या ३००० गाड्या असून त्याव्यतिरिक्त अंदाजे ३००० गाड्या सज्ज ठेवण्याच्या सूचना राज्यातील विभागांना देण्यात आल्या आहे.