आदित्य ठाकरेंवर कंगनाच्या प्रश्नांचा भडीमार


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आत्महत्येच्या तपासवरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये गदारोळ सुरु आहे. त्यातच या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर या आरोपांची मालिका येऊन ठेपली आहे. यावर गलिच्छ राजकारण होत असून मी संयम ठेवल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी काल दिला होता. त्यावरुन आता आदित्य ठाकरेंवर अभिनेत्री कंगना राणावतने थेट प्रश्नांचा भडीमार केला आहे.

पहिल्याच ट्विटमध्ये कंगनाच्या डिजिटल टीमने लिहिले आहे, हा…हा…, पहा गलिच्छ राजकारणावर कोण बोलत आहे. मुख्यमंत्र्यांची खूर्ची तुमच्या वडिलांना कशी मिळाली, हे देखिल गलिच्छ राजकारणावरील केस स्टडी आहे सर. हे सारे सोडा, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री वडिलांना सुशांतच्या मृत्यूविषयी हे प्रश्न विचारा.

रिया चक्रवर्ती कुठे आहे? सुशांतच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल का नाही केला? जेव्हा सुशांतच्या जिवाला धोका असल्याची एक तक्रार फेब्रुवारीतच दाखल झालेली होती, मग मुंबई पोलिसांनी एका दिवसात सुशांतने आत्महत्या केल्याचे घोषित करण्याची घाई का केली? असे प्रश्न विचारले आहेत.

कंगनाच्या टीमने तिसऱ्या ट्विटमध्ये चौथा प्रश्न विचारला आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलची माहिती आपल्याकडे का नाही? ज्याद्वारे मृत्यूच्या एक आठवडा आधी सुशांतने कोणाकोणाला फोन केले होते? कोणाकोणाशी बोलला होता? पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर लॉक करून का ठेवले आहे? सहावा प्रश्न- अखेर तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? आणि सातवा प्रश्न रिया आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?, असे प्रश्न विचारले आहेत.

यानंतर आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावताना या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्यामुळे कृपया याचे उत्तर द्यावे, असे कंगनाच्या टीमने म्हटले आहे.