52,509 नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा


नवी दिल्ली – आपला देश सध्या कोरोना या दुष्ट संकटासोबत लढा देत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहेतच, त्याचबरोबर या रोगावर अनेकजन यशस्वीरित्या मात करत आहेत. दरम्यान काल दिवसभरात देशात 52,509 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 19 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 19,08,255 वर पोहचला आहे. त्यापैकी 5,86,244 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 12,82,216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर देशात एकूण 39,795 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. पण त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या चांगली असल्यामुळे रिकव्हरी रेट देखील सुधारत आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना संकटाने संपूर्ण जगाला जेरीस आणल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये लागू असलेला लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर आजपासून देशासह राज्यात अनलॉक 3 ला सुरुवात होत आहे. अनलॉक 3 अंतर्गत नियमांत शिथिलता आणत अनेक सोयी-सुविधा सुरु करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.