व्हाइट हाऊसमध्येही साजरा होणार अयोध्येतील भूमिपूजन सोहळा


वॉशिंग्टन – उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतही हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जाणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या अयोध्येतील भूमिपूजनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यूएस कॅपिटोल हिल येथे मंगळवारी खास जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी बनवलेल्या ट्रकवर राम मंदिराचे डिजिटल फोटो दाखवले जाणार आहेत. अमेरिकेतील मंदिरांमध्ये भूमिपूजनाच्या निमित्ताने उद्या विशेष पूजा आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करणार असल्याचे तिथे स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी सांगितले.

कॅपिटोल हिल आणि व्हाइट हाऊसबाहेर आज रात्री फिरत्या ट्रकमधून एलईडी डिस्प्लेद्वारे भव्य श्री राम मंदिराचे फोटो प्रदर्शित केले जातील, असे वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी सांगितले. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा न्यूयॉर्कमध्येही साजरा केला जाणार आहे. तिथे वेगवेगळे होर्डिंग्स भाडयावर घेतले असून त्यावर प्रभू रामचंद्र आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे फोटो दाखवले जाणार आहेत.