मुंबईवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका


मुंबई – मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस दोन्ही यंत्रणा आपआपल्या परीने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण या तपास कार्यावरुन सध्या दोन राज्यांमधील राजकीय वातावरण चांगल्याच प्रकारे ढवळून निघत आहे. त्यातच या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकी गमावली आहे. आता मुंबईत निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी राहणे अजिबात सुरक्षित नसल्याचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटवर रेणुका शहाणे या खवळल्या संतापल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अमृता फडणवीसांवर राग व्यक्त केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय मुद्दा करु नका. तसेच मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका. जर तुमच्याकडे क्षमता आणि ताकद असेल तर त्याचा वापर पोलिसांची मदत करण्यासाठी करा. आज देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर तुम्ही असे वक्तव्य केले असते का?, असा सवाल रेणुका शहाणेंनी विचारला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना एलफिस्टन पूलदेखील कोसळला होता. त्यात मुंबईतील अनेक जणांचा मृत्यू झाला होता, हे देखील तुमच्या लक्षात असू द्या. पण त्यावेळी मुंबईत राहणे असुरक्षित आहे किंवा मुंबईमध्ये माणुसकी नाही आहे वगैरे असे कोणतेच ट्विट तुम्ही का केले नव्हते?. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्यावर रेणुका शहाणे यांनी खरमरती टीका केल्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांची चर्चा सुरु आहे. केवळ रेणुका शहाणेच नव्हे तर अनेकांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.