राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक


मुंबई : प्रदीर्घ आजारामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे

राज्यात कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे, त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. ते रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.