राममंदिर भूमिपूजनासाठी निमंत्रितांच्या यादीतून अडवाणी आणि जोशी यांची नावे वगळली


लखनौ : अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या राममंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले असून सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावे कमी करण्यात आली असून आता फक्त 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.

आता निमंत्रितांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचा समावेश नाही. कार्यक्रमाला येण्यास या दोन्ही नेत्यांनी असमर्थता दर्शवल्यामुळे त्यांची नावे यादीतून हटवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निमंत्रितांच्या यादीत राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावे आहेत.

या कार्यक्रमाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे.

याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. पण आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अयोध्येतील 52 संतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.