विराट कोहली आणि अभिनेत्री तमन्नाच्या अटकेसाठी न्यायालयात याचिका दाखल


चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयात दाखल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी एक याचिका करण्यात आली आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी ऑनलाइन गॅम्बलिंगची (जुगाराची) जाहिरात करत असून याचिकाकर्त्याने अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

ही याचिका चेन्नई स्थित एका वकिलाने दाखल केली असून ऑनलाईन जुगाराची जाहिरात विराट कोहली करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या अ‍ॅपचे व्यसन युवकांमध्ये वाढत चालले असल्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी मद्रास उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी केली आहे. तसेच विराट कोहली, तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अ‍ॅप्सची जाहीरात करून तरूणांची दिशाभूल करत असल्यामुळे या दोघांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. एका कर्जबाजारी तरूणाचा दाखला याचिकाकर्त्याने या याचिकेत दिला आहे. या ऑनलाईन अ‍ॅपसाठी एका तरूणाने पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे.