सर्वोच्च न्यायालयाची BS-IV वाहनांच्या नोंदणीला स्थगिती


नवी दिल्ली – BS-IV वाहनांच्या नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून न्यायालयाने नोंदणीसाठी ही स्थगिती पुढील आदेश येईपर्यंत दिली आहे. मोठ्या प्रमाणात BS-IV गाड्यांच्या मार्च महिन्यात झालेल्या विक्रीवर शंका उपस्थित करत या प्रकरणात न्यायालयाने काही गडबड असल्याचेही नमूद केले. सरकारच्या आदेशानुसार सध्या देशात BS-VI गाड्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी BS-IV वाहनांच्या विक्रासाठी लॉकडाउनच्या नंतरच्या १० दिवसांच्या दिलेल्या मुदतीचा आपला आदेश मागे घेतला होता. तसेच न्यायालयाने या १० दिवसांमध्येच विक्री करण्यात आलेल्या BS-IV वाहनांचीच नोंदणी करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ मार्च पश्चात विक्री करण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी थांबवण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान फेडरेशन ऑफ ऑटॉमोबिल डिलर असोशिएशनची देखील कान उघडणी केली होती. ज्या BS-IV वाहनांची विक्री आता करण्यात येत आहे ते न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. तसेच विक्रेत्यांवरही आम्ही कारवाई करू शकतो, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले होते. १ एप्रिलापासून BS-VI नियम देशात लागू करण्यात आले आहेत.