बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास करणार आंदोलन


मुंबई – मुंबईतील मुस्लीम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विरोधात नाराजीचा सुरु आवळत, या सरकारने आमचा अपेक्षा भंग केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत असून जर हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

मौलानांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे सरकारने अवघड केले आहे. त्याचबरोबर, बकऱ्यांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात असल्याचे मौलानांनी म्हटले आहे.

संबंधित मौलानांनी असा आरोप केला आहे, की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने आपल्या राज्याच्या सीमेवर अडवली जात आहेत. चेकपोस्टवरून आत येण्यापासून त्यांना रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत असल्यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याप्रकरणी ऑल इंडिया उलेमा काउंसिलचे मौलाना मसूद दरयाबादी म्हणाले, आमचे मुस्लीम आमदार आणि मंत्र्यांवर आम्हाला विश्वास होता. त्याचबरोबर आम्हाला आशा होती, की सुधारित नियमावली जारी करायला ते सरकारला सांगतील. त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्याचबरोबर यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हस्तक्षेप केला. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

हांडीवाली मशिदीचे इमाम मौलाना ऐजाज कश्मीर यांनी म्हटले आहे, की जेथे पोलिसांनी वाहने अडवली, तेथे त्यांचे मुस्लीम सहकारी देखील गेले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. माजी मंत्री नसीम खान म्हणाले, इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाइन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत. रोज देवनारच्या कत्तलखान्यात म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. यापूर्वीचे फडणवीस सरकार प्रत्येक सणापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारने, अशी कुठलीही बैठक घेतली नसल्याचेही शेख म्हणाले.