सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फेटाळली आहे. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंहने टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण होते याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. याच दरम्यान त्याच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशी मागणी वारंवार केली जात असतानाच न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.

ही याचिका अलका प्रिया नावाच्या तरुणीने दाखल केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना पोलिसांना त्यांचे काम करु द्या असे सांगितले. पोलिसांना त्यांचे काम करु द्या. व्यक्ती चांगली होती की वाईट याचा याच्याशी काही संबंध नाही. याचा कार्यक्षेत्राशीही संबंध आहे. जर तुमच्याकडे काही ठोस पुरावे असतील, तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जा, असे सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितले. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस सध्याच्या घडीला याप्रकरणी तपास करत आहेत.