दिल्लीकरांना केजरीवाल सरकारचा दिलासा; डिझेल प्रतिलिटर आठ रुपयांनी स्वस्त


नवी दिल्ली – दिल्लीकरांना सत्ताधारी केजरीवाल सरकारने मोठा दिलासा दिला असून डिझेलवर असलेल्या व्हॅटमध्ये दिल्ली सरकारकडून मोठी कपात केली आहे. डिझेलवर आकारण्यात येणारा व्हॅट ३० टक्क्यावरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्यामुळे दिल्लीतील डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर ८.३६ रुपये कमी होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

डिझेलवरील व्हॅट ३० वरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ होणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या संकट काळात दिल्लीची अर्थव्यवस्था पुनर्जीवित करणे आमच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. पण जनतेच्या सहकार्याने हे साध्य करु, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आता प्रतिलिटर डिझेलचा दर ८२ ऐवजी ७३.६४ रुपये असेल. दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांनी दर कमी करण्याची मागणी केल्याचे केजरीवाल म्हणाले. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा सुद्धा भडका उडतो. आता डिझेलचे दर कमी करुन महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.