Royal Enfield च्या या सुविधेमुळे बुलेट सर्व्हिसिंगसाठी वर्कशॉपमध्ये जाण्याची नाही गरज


कोरोनाच्या संकटकाळात ज्या ग्राहकांना जवळच्या वर्कशॉपमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करणे शक्य नाही अशा आपल्या ग्राहकांसाठी Royal Enfield ने एक खास सेवा सुरू केली असून कंपनी ‘सर्विस ऑन व्हील्स’ या नव्या सुविधेनुसार ग्राहकाच्या घरी जाऊन बाइकची सर्व्हिसिंग करणार आहे.

‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ या सेवेसाठी कंपनीने खास 800 मोटरसाइकल्स देशाच्या विविध डीलरशिप्समध्ये तैनात ठेवल्या आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच संपर्कात न येता खरेदीला चालना देण्यासाठी ऑनलाइन बाइक बूकिंग सेवाही सुरू केली होती. ग्राहकाच्या घरी ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ सेवेनुसार एक मोबाइल सर्व्हिस टीम जाईल आणि बाइकची पूर्ण सर्व्हिसिंग करेल. या टीमकडे टूल किटसोबत गरज भासल्यास बदलण्यासाठी ओरिजनल स्पेअर पार्ट्सदेखील असतील.

बाइकच्या सर्व्हिसिंगसह लहान-मोठे रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल दोष, पार्ट्स बदलणे किंवा दुरूस्ती यासारखी कामे कंपनीची मोबाइल टीम करेल. ही टीम साधारणपणे 80 टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारची सर्व्हिसिंग करेल. Royal Enfield च्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या डीलरशिपमध्ये फोनद्वारे संपर्क करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसिंगसाठी वेळ आणि दिवस सांगितल्यानंतर मोबाइल टीम घरी येऊन तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करेल.