आता ‘ईडी’ची देखील सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एंट्री


मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना याप्रकरणात पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी आर्थिक आरोपही केल्यामुळे आता या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) लक्ष घातले आहे. ईडीने सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेले आरोपपत्रातील माहिती मागवल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे दिले आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असतानाच पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यावरून रिया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणात ईडी आर्थिक अंगाने तपास करणार आहे. बिहार पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती ईडीने मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार असून, बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात सुशांतचे सर्व बँक खात्यांची माहिती ईडीने मागवली आहे.