अयोध्येतील 30 एकर जमिनीवर बांधणार भव्य बुद्धविहार : रामदास आठवले


मुंबई : अयोध्येत बुध्दविहार बांधण्यासाठी गायक आनंद शिंदे यांच्या मागणीच्या आधीपासूनच मी प्रयत्नशील असून अयोध्येत राम मंदीरांचे निर्माण होणार आहे. त्याचबरोबर मशिद देखील व्हायला हवी आणि बुद्ध विहार देखील व्हायला हवे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मी स्वतः भेट घेणार आहे. तसेच त्याठिकाणी एका ट्रस्टची स्थापना करून तीस एकर जागा खरेदी करुन त्या ठिकाणी बुद्धविहार बांधणार आहे. कारण राम मंदिराच्या आधीदेखील त्याठिकाणी बुद्धविहार होते. त्याचे अवशेष देखील मिळाले असल्यामुळे भव्य बुद्धविहार करण्याचा आमचा मानस असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

आठवले म्हणाले, लवकरच यासाठी एका ट्रस्टची स्थापना करणार आहे. जमीन या ट्रस्टच्या माध्यमातून खरेदी करण्यात येईल. अयोध्येत येत्या काळात राम मंदिरासोबतच़ बुद्धविहार देखील अयोध्येत येणाऱ्या भाविकांना पाहायला मिळणार आहे. या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन गायक आनंद शिंदेनी केल्याची माहिती मला मिळाली आहे. यामध्ये आनंद शिंदे यांनी राजकारण आणण्याची गरज नाही. सध्याची परिस्थिती पाहता सगळे नेते एकत्र येणार नाहीत. शिवाय मी देखील त्यांच्यासोबत जाणार नाही. बुद्धविहार बांधण्यासाठी मी माझे प्रयत्न सुरु ठेवणार आहे.