गिरीश बापट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घेण्याची मागणी


पुणे – देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या कोरोनाचा राज्यातील मोठ्या शहरांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या पुण्यातही मोठ्या प्रमाणात वाढलेली असतानाच भाजप खासदार गिरीश बापट यांनी कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. त्यातबरोबर त्यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्याची ही मागणी केली आहे. यासंदर्भातील वृत्त पुणे मिररने दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू आहे. परंतु यादरम्यान लवासाकडे गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात एक पत्र पाठवले असून लवासाच्या जागेचा वापर कोविड केअर सेंटरसाठी करण्याचेही सूचवले आहे. यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर सेंटर तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. मारणे यांनी गिरीश बापट यांच्याकडे त्यासंबंधीचे निवेदन दिल्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवले होते. कोरोनाबाधितांची मुळशी तालुक्यातही संख्या वाढत असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नसल्याने त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली.

सध्या लवासामधील जागा रिक्त आहेत आणि या जागेचा वापर कोरोनाविरोधातील लढ्यात करता येऊ शकतो. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि अन्य मालमत्ता आपण ताब्यात घ्याव्यात अशी मी विनंती करत आहे. रुग्णांसाठी बेड्स आणि कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो, असे बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. लवासामध्ये अनेक इमारतींसोबतच सुविधांनी परिपूर्ण असे एक रुग्णालयदेखील आहे. फारच कमी लोक त्या ठिकाणी राहत आहे. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन करण्यासाठी ती जागा चांगली ठरू शकते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसेच ज्या प्रमाणे त्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध असल्यामुळे पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. मुळशीतील कोरोनाबाधित रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जाऊ शकतात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. परंतु, या जागेचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रस्तावाचा निषेध करण्यात येत असल्याचेही त्यांनी कबूल केले.

कोविड केअर सेंटरमध्ये त्याचे रूपांतर झाल्यास कोरोनाची बाधा आपल्याला होईल आणि शहरात त्याचा प्रसार होईल अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. परंतु आम्ही रिक्त असलेल्या मोठ्या जागांबाबत बोलत आहोत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचीही भीती कमी आहे. आम्ही केवळ अशाप्रकारच्या तयार पायाभूत सुविधांचा वापर करू इच्छितो, असा आग्रह बापट यांनी धरला.परंतु या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शंका उपस्थित केली आहे. लवासा हे ठिकाण फार दूर असून काही अडचणीदेखील आहेत. विविध बाबींचा विचार केल्यानंतरच अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गिरीश बापट यांनी काही सूचना केल्या आहेत. जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.