बृह्नमुंबई महानगरपालिकेने बिल्डिंग सील करण्याच्या नियमात केला बदल


मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांचे जनजीवन पूर्णपणे अस्तव्यस्त झाले असून मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्याही मोठी आहे. ज्या परिसरात अथवा बिल्डींगमध्ये कोरोनाबाधित आढळून आले, तो परिसर अथवा बिल्डींग मुंबई महानगरपालिकेकडून सील कण्यात आली आहे. आता याच दरम्यान बृह्नमुंबई महानगरपालिकेने कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या बिल्डिंग अथवा परिसर सील करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता यापुढे तीन पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आल्यानंतरच महापालिकेकडून पूर्ण बिल्डींग सील केली जाणार आहे.

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा प्रसारही मुंबईत झपाट्याने झाला. मुंबईतील रुग्णसंख्येची वाढ सुरूवातील मंद होती. पण नंतरच्या काळात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती दररोज येणाऱ्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. सध्या मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ८८२ एवढी असून त्यातील ८४,५७० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर सध्याच्या घडीला केवळ १९,९९० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

दरम्यान, कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात मुंबई महानगरपालिकेने बदल केला आहे. जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण एका बिल्डिंगमध्ये आढळून आले, तर महानगरपालिकेकडून संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील, तर महापालिका अधिकाऱ्यांकडून संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कोणतेही बंधन नसल्याची माहिती महापालिकेच्या आर दक्षिण वार्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेने पश्चिम उपनगरात एक रुग्ण आढळून आलेल्या इमारतीही सील करण्याचा निर्णय घेतला होता. नागरिकांनी मागील आठवड्यात घेण्यात आलेल्या या निर्णयाला आक्षेप घेतला होता. एक रुग्ण आढळून आलेल्या बिल्डिंगमधील रहिवाशांच्या हालचालींवर १४ दिवसांसाठी निर्बंध घालण्याला नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेकडून नियमात बदल करण्यात आला आहे.