राहुल गांधी यांचा पुनश्च हल्लाबोल; देश उद्धवस्त करत आहेत मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुनश्च हल्लाबोल केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे परिणाम झाला असल्यामुळे रोजगार वाढीलाही त्याचा फटका बसला आहे. संसदीय समितीला माहिती देताना १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. राहुल गांधी यांनी या मुद्यांवरून मोदींवर टीका केली असून, मोदी देश उद्धवस्त करत असल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांबद्दल वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीत माहिती दिली. देशातील १० कोटी नोकऱ्या कोरोनाच्या परिणामामुळे संकटात असल्याचे केंद्र सरकारने समितीला सांगितले. राहुल गांधी यांनी हे वृत्त ट्विट करून मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी देश उद्ध्वस्त करत आहेत. पहिली नोटाबंदी, दुसरी जीएसटी, तिसरी कोरोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केले आहे. हे भ्रम लवकर तुटणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.