दिलासादायक बातमी…! मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यापेक्षाही कमी


मुंबई : मंबईने काल एकाच दिवशी वेगवेगळ्या निकषांमध्ये मोलाचे टप्पे गाठले असून त्यात महत्वाचा टप्पा मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. तर 70 दिवसांच्या पार रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी गेला आहे. त्याचबरोबर मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्यांची तपासणीसाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाच्या संसर्गाच्या प्रारंभापासून अधिकाधिक चाचण्या म्हणजे, खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून कोरोना चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवण्यावर भर दिला आहे. पालिका प्रशासनाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन चाचण्या केल्या आहेत.

मुंबईत पहिली कोरोना चाचणी दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आली. प्रारंभी मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये गाठल्यानंतर 2 लाख चाचण्यांचा टप्पा 1 जून 2020 रोजी गाठला गेला. म्हणजेच 1 लाख ते 2 लाख हा टप्पा गाठण्यासाठी 25 दिवस लागले. त्यानंतर दिनांक 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर दिनांक 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला.

काल 5 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून अवघ्या 15 दिवसांमध्ये 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा गाठण्यात आला आहे. यातून असे निदर्शनास येते की, चाचण्यांचे हे लाखा-लाखांचे टप्पे गाठताना त्यातील दिवसांचे अंतर सातत्याने कमी होत आहे, याचाच अर्थ दैनंदिन सरासरी चाचण्यांचा वेग वाढला आहे, त्याची सरासरी वाढली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर आता 0.97 टक्के एवढा नोंदवला गेला असून हा दर 1 टक्क्याच्याही खाली आल्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण 18 म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. आता 72 दिवसांचा हा सरासरी कालावधी झाला आहे. मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांपैकी 14 विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा 72 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभाग 90 दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग 100 दिवसांपेक्षा अधिक दिवसांची सरासरी राखून आहेत. रुग्ण दुप्पट होण्यासाठी अधिक कालावधी म्हणजे संसर्गाचा फैलाव तितकाच मंदावला, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधीदेखील सातत्याने वाढता असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक आहे.

मुंबईत एकीकडे दैनंदिन चाचण्यांची संख्या, त्याची सरासरी वाढली असली तरी नवीन रुग्ण आढळण्याची सरासरीदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. सोबतच प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 83 हजार 097 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारांपेक्षाही कमी झाली आहे.