सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पाटणा पोलीस सुरुवातीला टाळाटाळ करत असल्याची खळबळजनक माहिती दिली. पाटणा पोलिसांकडे सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना सर्व प्रकरण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी समजावून सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सुशांतचे वकील म्हणाले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी १४ जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.
सुशांतच्या वकीलाची माहिती; रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसांची टाळाटाळ
सीबीआय चौकशीची सुशांतच्या कुटुंबीयांनी मागणी केली नसल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले. रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तसेच सुशांतला धमक्या दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण त्याला रियाने रोखले. आपले ऐकले नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचे सांगणार अशी धमकी तिने दिली होती. सुशांत जेव्हा आपले ऐकत नसल्याचे आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे लक्षात आले तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला.
त्यांनी पुढे सांगितले की, सुशांतसोबत रिया एकत्र राहत होती. तिने आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचे सांगितले होते. आपल्याला रियाने धमकावले असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचे सुशांतने आपल्या बहिणीला सांगितले होते. मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. रियाशी संपर्क साधण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.