रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरिता मोबाईल ॲप्स विश्वासू नाही


औरंगाबाद : कोरोनाच्या संकटकाळत सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये कृपया हे ॲप इंस्टॉल करा आणि कोविड काळात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा, असा दावा केला जात आहे. पण महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी या व्हायरल मेसेज बाबत सांगताना, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरिता मोबाईल ॲप्स विश्वासू साधन नाही. अशा ॲप्सचा वापर करणे घातक ठरू शकतो, असे म्हटले आहे.

त्याचबरोबर या व्हायरल मेसेजमध्ये हे ॲप तेव्हाच कार्यरत होईल जेव्हा आपल्या मोबाईलमधील सर्व परमिशनस द्याल. परंतु अशा परमिशन देणे यूझर्ससाठी खूप धोक्याचे आहे. हे ॲप आपल्या मोबाईल मधला डेटा सुद्धा चोरू शकतात, असे देखील यादव यांनी सांगितले आहे. हा मेसेज एक अर्धसत्य आहे, कारण संशोधनाने कोणतेही अॅप रक्तातील ऑक्सिजनची पातळी योग्यरीत्या मोजू शकत नाही, असे सिद्ध झाले आहे आणि अशा ॲप्सवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरु शकते, असे यादव यांनी सांगितले आहे. योग्यरित्या हे ॲप कार्यरत नाही. कारण यांची कार्यपद्धती ही मेडिकल पल्स oximetry यंत्राद्वारे केलेल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याच्या पद्धती सारखी नाही.

वापरकर्त्याच्या खालील गोष्टींवर कोणतेही हेल्थकेअर ॲप हे लक्ष ठेवते. जसे की आरोग्य विषयक माहिती देणे, डॉक्टरची ऑनलाईन सल्लामसलत करणे आणि फिटनेस गोल प्राप्त करणे याकरिता मदत करतात. जरी वापरकर्त्याला हे हेल्थकेअर ॲप आरोग्यविषयक माहिती सोप्या पद्धतीने देत असतील. तरीदेखील वापरकर्त्याचा खाजगी डेटा हा ॲपद्वारे घेतला जातो. हा डेटा गोळा करून साठवून शेअर करून ॲपच्या कार्यप्रणाली साठी वापरला जातो.

सध्याच्या भीतीदायक वातावरणाचा सायबर क्रिमिनल फायदा घेत मोबाईल वापरकर्त्यांची खाजगी माहिती अथवा फिंगरप्रिंट सारखी बायोमेट्रिक माहिती अशा खोट्या लिंक व ॲप्लिकेशनच्या आधारे घेऊ शकतात. रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्याकरिता अॅप विश्वासू साधन नाही आणि जरी तुम्हाला एखादा हेल्थकेअर आप वापरायचा असेल तर डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेऊन ॲपचे सेटिंग कस्टमाइज्ड करणे आवश्यक आहे.

त्यामुळे जर एखादे ॲप डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला आली असेल तर हे ॲप काळजीपूर्वक डाउनलोड करा. अन्यथा आपल्या मोबाईलचा डेटा चोरीला जाऊन त्याचा वापर सायबर क्राईमसाठी होऊ शकतो. आपली अशी फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर साईबर क्राईमकडे तक्रार करा अन्यथा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा, अशी माहिती सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे.

अशी फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात

  • कोणतेही ॲप डाऊनलोड करताना सर्वात प्रथम डेवलपर रेटिंग, रिव्ह्यू, बग्ज आणि टोटल डाउनलोड हे तपासून घेणे गरजेचे आहे.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर अॅपने मागितलेल्या परवानग्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि गरज नसलेल्या परवानग्या देऊ नयेत.
  • डाऊनलोड करण्याआधी पुरेपुर काळजी घेणे गरजेचे आहे.
  • सिक्युरिटी असलेले ॲप घेणे कधी सुरक्षित असते.