एवढ्या रुपयांना मिळणार कोरोनाग्रस्तांसाठी वापरली जाणारी औषधाची एक गोळी


नवी दिल्ली – भारतीय औषध महानियंत्रक (DCGI) यांच्याकडून कोरोनाग्रस्तांसाठी वापरले जाणारे फेविपिराविर हे औषध बनवण्यासाठी आणि त्याच्या विक्रीसाठी हेटेरो (Hetero) या औषध निर्माण कंपनीला परवानगी मिळाली असून हेटेरो लॅबने हे जेनेरिक औषध फेविविर (Favivir) नावाने बाजारात आणले आहे. गोळ्यांच्या स्वरुपात हे औषध उपलब्ध असणार असून याच्या एका गोळीची किंमत ५९ रुपये असून ती आजपासून देशभरातील सर्वच मेडिकलमध्ये उपलब्ध असणार आहे.

कोविफोर (Covifor) अर्थात रेमडेसेविर (Remdesivir) या औषधानंतर हेटेरो लॅबने फेविविर हे औषध बाजारात आणले आहे. या औषधांचा वापर कोरोनाग्रस्तांवरील उपचारांमध्ये केला जातो. यासंदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्प्रेसने दिले आहे. तोंडावाटे घेतले जाणारे हे अँटिव्हायरल औषध असून या औषधाचे क्लिनिकल चाचण्यांचे पॉझिटिव्ह परिणाम दिसून आले आहेत. प्रामुख्याने हे औषध सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर वापरले जाते.

हेटेरो कंपनीकडून निर्मित फेविविर या औषधच्या एका गोळीची किंमत ५९ रुपये असून हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडच्या माध्यमातून त्याची विक्री आणि वितरण केले जात आहे. आजपासून देशभरातील सर्व प्रकारच्या रिटेल मेडिकल स्टोअर्समध्ये आणि रुग्णालयांतील मेडिकल्समध्ये हे औषध उपलब्ध असणार आहे. पण हे औषध डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच विकत घेता येणार आहे.