‘कांचा चीना’पेक्षा खतरनाक KGF Chapter 2 मधील ‘अधीरा’चा लुक


केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन दिले होते, त्याचबरोबर चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. आता प्रेक्षक KGF: Chapter 2 मधील रॉकीभाईची आतुरतेने वाट पाहत आहेत. केजीएफच्या दुसऱ्या भागात यशसह अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रविना टंडनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त ‘अधीरा’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच KGF: Chapter 2मधील ‘अधीरा’चा लूक रिलीज करण्यात आला असून या अवतारात संजय दत्त खूपच भयावह अवतारात दिसत आहे.

संजय दत्तचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. दरम्यान यापूर्वी ‘अग्निपथ’ या चित्रपटात संजय दत्तने ‘कांचा चिना’ ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या चित्रपटातील लूकला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय दत्त ‘अधीरा’च्या भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे.

आपल्या लूकचा फोटो शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या चित्रपटात काम करणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, वाढदिवसाच्या दिवशी मी यापेक्षा अधिक चांगली भेट काय शकतो? चाहत्यांचे प्रेम आणि समर्थन “खूप धन्यवाद.” अभिनेता संजय दत्त आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे.