आता तरी राफेलची खरी किंमत सांगा; दिग्विजय सिंहांचा हल्लाबोल


नवी दिल्ली : आज हरियाणाच्या अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी दाखल होणार आहे. पण केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात भारतीय हवाई दलात सामील होणाऱ्या या विमानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राफेलच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी पुन्हा सरकारसमोर राफेल डीलच्या तपशिलांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, आता या डीलची किंमत केंद्र सरकारने सांगितली पाहिजे.

यासंदर्भात दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले असून आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, अखेर राफेल लढाऊ विमान आले आहे. २०१२ मध्ये १२६ राफेल खरेदी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएने घेतला होता. १८ राफेल वगळता भारत सरकारच्या एचएएलमध्ये (हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड) निर्मिती करण्याची तरतूद होती. भारतात आत्मनिर्भर होण्याचे हे प्रमाण होते.

त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये एका राफेलची किंमत ७४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. पण, मोदी सरकार आल्यानंतर संरक्षण आणि वित्त मंत्रालय आणि कॅबिनेट समितीच्या परवानगीशिवाय मोदींनी फ्रान्ससोबत नवीन करार केला आणि एचएएलचा अधिकार काढून खासगी कंपनीला देण्याचा करार केला. राष्ट्रीय सुरक्षाकडे दुर्लक्ष करून, १२६ राफेल खरेदी करण्याऐवजी केवळ ३६ खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

तसेच आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेस सरकारने ७४६ कोटी रुपये एका राफेलची किंमत निश्चित केली होती, परंतु संसदेत आणि संसदेच्या बाहेरही अनेकवेळा मागणीकरूनही ‘चौकीदार’ महोदय आतापर्यंत राफेलची खरेदी किती रुपयांना केली, हे सांगण्यास टाळाटाळ का करत आहेत? कारण, ‘चौकीदार’ची चोरी उघडकीस येईल !! ‘चौकीदार’जी, आता त्याची किंमत सांगा!!, असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला केला.

त्याचबरोबर आम्ही जर याप्रकरणी प्रश्न विचारले तर मोदींची ट्रोल आर्मी आणि त्यांच्या हातातील बाहुले असलेले माध्यम प्रतिनीधी आम्हाला देशद्रोही घोषित करतात. लोकशाही असलेल्या देशात आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का, असा सवाल देखील दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.