तारक मेहता…मधून अंजली भाभींची एक्झिट ?


छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेली तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 12 वर्षांपासून प्रेक्षकांचे निख्खळ मनोरंजन करत आहे. त्यामुळेच ही मालिका टीआरपीमध्ये इतर मालिकांच्या तुलनेत कितीतरी पट वरचढ ठरत आहे. कालच या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन सुद्धा दाखवण्यात आले होते. पण आता या मालिके संदर्भातील एक मोठी माहिती समोर आली आहे. मालिकेत तारक मेहता यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अंजली मेहता अर्थात नेहा मेहता यांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण मालिकेच्या निर्मात्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. पण लॉकडाऊननंतर सुरु झालेल्या मालिकेच्या चित्रीकरणाला नेहा मेहता या अद्याप उपस्थित न झाल्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

यासंदर्भात स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना आपण शो सोडत असल्याबाबत नेहाने कळवले आहे. शोच्या पुन्हा शूटिंगला 10 जुलैपासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून नेहा मेहता शूटिंगला आलेल्या नाहीत. 22 जुलै पासून शोचे पुन्हा प्रक्षेपण सुरु झाले आहे. अंजली मेहता आणि तारक मेहता हे मालिकेतील एक महत्वाचे पात्र आहे, डाएटमुळे नवऱ्याच्या मागे हात धुवून लागलेली अंजली हुशार पण तितकीच भावुक दाखवली आहे.