कोरोनाच्या नावाखाली मिळवली मदत, त्याच पैशांनी खरेदी केली लॅम्बोर्गिनी

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात गरीबी आणि बेरोजगारी वाढली आहे. अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत. सरकार संकटात अडकलेल्यांना मदत करत आहे. मात्र अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणाऱ्या डेव्हिड टी. हाइन्स नावाच्या उद्योगपतीने कोरोनाच्या नावाखाली सरकारकडून मदत तर घेतली, मात्र त्या पैशातून चक्क कोट्यावधी रुपयाची लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली.

डेव्हिडला सरकारकडून 4 मिलियन डॉलर्सचा (जवळपास 29 कोटी रुपये) मदत निधी मिळाला होता. ही रक्कम त्याला पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी) अंतर्गत मिळाली होती. पीपीपीचा उद्देश कोरोना व्हायरस महामारीमुळे नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना मदत करणे हा आहे. डेव्हिडने काही कंपन्यांतर्फे 13.4 मिलियन डॉलर पीपीपी कर्जासाठी अर्ज केला होता. कंपन्यांबाबत खोटी व भ्रामक माहिती दिली आणि 4 मिलियन डॉलर कर्ज मिळवण्यास यशस्वी झाला.

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आरोप केला आहे की, त्याने फंड मिळाल्यानंतर काही दिवसातच जवळपास 3,18,000 डॉलर्सची लॅम्बोर्गिनी हुराकन स्पोर्ट्स (2020) कार खरेदी केली. सोबतच मायामी बीचवरील महागड्या हॉटेलमध्ये थांबला व भरपूर शॉपिंग केली.

बँक ऑफ अमेरिकेने डेव्हिडच्या 3 पीपीपी अर्जांना मंजूरी दिली होती. माहिती समोर आल्यानंतर डेव्हिडला अटक करण्यात आले आहे. त्याच्यावर फसवणूक आणि खोटी माहिती देण्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी त्याने खरेदी केलेले लॅम्बोर्गिनी आणि बँक खात्यातील 3.4 मिलियन डॉलर्स जप्त केले आहेत.