अमेरिका इतर देशांना देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस – ट्रम्प

कोरोना व्हायरस महामारीमुळे सर्वाधिक नुकसान अमेरिकेचे झाले आहे. अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसीवर देखील काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसची लस तयार झाल्यावर अमेरिका इतर देशांना देखील लसीचा पुरवठा करेल, असे म्हटले आहे.

जगभरातील अनेक देश कोरोनावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत देखील त्यापैकी एक आहे. ट्रम्प म्हणाले की, आमच्याकडे कोरोनाची लस आल्यावर इतर देशांना देखील दिली जाईल. लसीबाबत जगभरात वेगाने प्रयत्न केले जात आहे. कदाचित आम्ही जगातील अनेक भागांमध्ये लसीचा पुरवठा करू. जसे आम्ही व्हेंटिलेटर आणि अन्य वस्तूंबाबत केले.

ट्रम्प सरकारचे या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा 2021 च्या सुरुवातीला लस आणण्याचे लक्ष्य आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने सांगितले की, अमेरिकेची बायोटेक्नोलॉजी कंपनी मोडेर्नाने विकसित केलेल्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झाले आहे.