केंद्र सरकारचे हे खास मोबाइल अ‍ॅप देणार 450 शहरांतील हवामानाची माहिती


नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील बदलते हवामान आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावी यासाठी एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मौसम’ नावाचे हे अ‍ॅप भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्री हर्षवर्धन यांनी लाँच केले आहे. ‘मौसम’ हे अ‍ॅप अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

जवळपास 200 शहरांचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा इत्यादी अनेकप्रकारची माहिती ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे मिळेल. त्याचबरोबर जवळपास 450 शहरांच्या आगामी सात दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाज अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. यातील माहिती दिवसातून आठ वेळेस अपडेट होईल. एखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. तर, यामध्ये युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारे फीचरही आहे.

हवामानाची सर्व महत्त्वाची ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे माहिती मिळेल. ‘मौसम’ अ‍ॅप इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT),भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे डेव्हलप केले आहे. यावेळी, वेधशाळेच्या नेटवर्कमध्ये वाढ करण्यासाठी, नवीन संगणकीय संसाधने खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.