करण जोहरने समिक्षकांना पुरस्कार न दिल्यास बहिष्कार टाकण्याची दिली होती धमकी


बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच दरम्यान बॉलीवूडमधील बड्या हस्तींवर टीका देखील करण्यात येत आहे. त्यातच बॉलिवूडमधील गटबाजीवर अनेक कलाकार व चित्रपट समिक्षक स्वत:हून पुढे येत भाष्य करत आहेत. याच दरम्यान निर्माता करण जोहरची प्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता यांनी पोलखोल केली आहे. करणने आपल्या चित्रपटाला पुरस्कार दिला नाही तर थेट पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आश्चर्याची बाब म्हणजे शाहरुख खानने देखील त्याच्या या मागणीला पाठिंबा दिल्याचा खळबळजनक आरोप शेखर गुप्ता यांनी केला आहे.

द प्रिंट या वेबसाईटवर शेखर गुप्ता यांनी लिहिलेल्या लेखात बॉलिवूडची चिरफाड केली आहे. त्यांनी या लेखात करण जोहरचा १० वर्षांपूर्वीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ते म्हणाले, माय नेम इज खान हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक व समिक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. तरीही करण जोहरने या चित्रपटाला पुरस्कार द्यावा अशी मागणी केली होती. कारण त्याने या फ्लॉप चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च केला होता. परंतु त्याच्या मागणीस समिक्षकांनी नकार दिला. त्यावेळी त्याने त्या पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.

शाहरुख खान आणि काही अन्य कलाकारांनीही त्याच्या या धमकीला पाठिंबा दिला होता. करणने धमक्या देऊन असे अनेक पुरस्कार बळकावल्याचा किस्सा शेखर गुप्ता यांनी सांगितला. अनेक माध्यम संस्थांसाठी शेखर गुप्ता यांनी संपादक पदावर काम केले आहे. एक नामांकित चित्रपट समिक्षक म्हणून ते ओळखले जातात. तसेच अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये समिक्षकांची भूमिका देखील त्यांनी बजावली आहे. या पार्श्वभूमीवर शेखर गुप्तांनी केलेल्या या आरोपांमुळे बॉलिवूमध्ये सध्या खळबळ माजली आहे.