बूट विक्रेत्याच्या मुलीला 12वीत मिळाले 97% गुण, मदत मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले…

मध्य प्रदेशच्या श्योपूर येथे रस्त्याच्या कडेला बूट विकणाऱ्या व्यक्तीच्या मुलीला 12वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाले आहेत. आपल्या स्ट्रीमच्या मेरिट सूचीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. या मुलीचे नाव मधू आर्य आहे. दररोज सकाळी 4 वाजता उठून, ती 8-10 तास अभ्यास करत असे. आज मेहनतीच्या जोरावर तिने यश मिळवले आहे. सोशल मीडियावर तिचे कौतुक होत असून, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील तिचे कौतुक केले आहे.

मधूला सायन्स स्ट्रिममध्ये 500 पैकी 485 गुण मिळाले. तिला पुढे जाऊन डॉक्टर बनायचे आहे. पुढील शिक्षणासाठी तिने मध्य प्रदेश सरकारकडे मदत मागितली आहे.  तिच्या मदतीनंतर शिवराज सिंह चौहान यांनी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्यांनी मधूला शुभेच्छा देत ट्विट केले की, मुली मधू, खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. तू केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष दे. जोपर्यंत तुझे मामा शिवराज आहेत, तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही. आमचे सरकार तुझ्या लक्ष्य प्राप्तीसाठी शक्य ती मदत करेल. तुझे स्वप्न नक्कीच पुर्ण होईल. माझा आशिर्वाद तुझ्यासोबत आहे.

मधूला एवढे गुण मिळाल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत.