बकरी ईदला बकरे कापण्याऐवजी आपल्या मुलांचा बळी द्या, भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य


गाजियाबाद – बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. तुम्हाला जर कुर्बानी द्यायचीच असेल, तर ती तुमच्या मुलांची द्या, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी दिला आहे.

सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण त्याऐवजी आता नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे माझी इस्लाम धर्म मानणाऱ्यांना विनंती आहे. आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी ते देखील देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे. तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी. निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचे सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावे लागेल आणि त्याला लोक खातील आणि हा निसर्गाचा नियम असून जसे ज्याचे कर्म, तसे फळ त्याला भोगावे लागते, असे नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटले आहे.