राज्यातील वाढीव विजबिलांवरुन राज ठाकरेंचा खळखट्याकचा इशारा


मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यातील वाढीव वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. यासंदर्भात मुंबईसह राज्यभरातून ओरड होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याच मुद्यावरून आता भडकले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे. महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना राज्य सरकारने तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांविरोधात आम्हाला खळखट्याक करावे लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

संपूर्ण व्यवहारांना लॉकडाउनच्या काळात बंदी असल्याने वीजबिले पाठवण्यात आली नव्हती. वीजबिले देण्यास जूननंतर सुरूवात झाली असून, वीजबिलाची रक्कम बघून अनेकांना शॉक बसला आहे. सर्वसामान्यांपासून चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही या मुद्यावर आवाज उठवला होता. पण त्याची फारशी दखल घेतली न गेल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच वीजबिलाच्या मुद्यावर सरकारचे लक्ष वेधले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र