… म्हणून राम मंदिराच्या 2000 फूट खाली ठेवले जाणार ‘टाईम कॅप्सूल’

राम मंदिराच्या हजारो फूट खाली एक कॅप्सूल ठेवले जाणार आहे. जेणेकरून, भविष्यात या संदर्भातील तथ्यांसोबत कोणताही विवाद राहणार नाही, राम मंदिराची जबाबदारी सांभाळणाऱ्या राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या कॅप्सूलमध्ये मंदिराचा इतिहास आणि या संदर्भातील तथ्यांची माहिती असेल.

कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, राममंदिरासाठीचा संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष वर्तमान आणि भविष्यातील पीढीसाठी एक शिकवण आहे. राम मंदिराच्या निर्माण स्थळाच्या 2000 फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवले जाणार आहे. जेणेकरून, भविष्यात कोणालाही राम मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास, त्याला राम जन्मभूमीसंबंधीत तथ्य सापडतील व यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही. त्यांनी सांगितले की, हे कॅप्सूल एका ताम्र पत्रात ठेवले जाईल.

चौपाल यांनी सांगितले की, 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित पार पडणाऱ्या भूमीपूजनाला देशातील अनेक पवित्र नद्यांमधून, जेथे प्रभू रामाचे पाऊल पडले होते अशा ठिकाणांवरून जल आणि अनेक तीर्थांवरून माती आणली जात आहे. पवित्र जलाद्वारे भूमीपूजनादरम्यान अभिषेक केला जाईल.

दरम्यान आज (28 जुलै) राम मंदिर उभारले जात असतानाच जमिनीखाली दोन हजार फूट ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त काल सर्वच माध्यमांमध्ये झळकले होते. पण राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती दिली आहे.