देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १४ लाखांचा टप्पा - Majha Paper

देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १४ लाखांचा टप्पा


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ होतानाचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येंने आता १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशभरात मागील चोवीस तासांत आढळलेल्या कोरोना रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

काल दिवसभरात तब्बल ४९ हजार ९३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर, कोरोनामुळे ७०८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ लाख ३५ हजार ४५३ वर पोहचली आहे. यामध्ये ४ लाख ८५ हजार ११४ अॅक्टिव्ह रुग्ण, ९ लाख १७ हजार ५६८ जण डिस्चार्ज देण्यात आलेले व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३२ हजार ७७१ जणांचा समावेश आहे.

दरम्यान आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई, नोएडा आणि कोलकाता अशा तीन शहरांमध्ये अत्याधुनिक कोविड वैद्यकीय प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून त्यांचे उद्घाटन होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या समारंभाला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेची क्षमता प्रतिदिन १० हजार नमुना चाचण्यांची असल्याने ३० हजार अतिरिक्त चाचण्या करता येतील.